सातारा : महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे भाग्य आहे की त्यांना श्री.छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा लाभला आहे. सध्या मुलांपुढे आदर्श ठेवायचा असेल तर पालकांनी त्यांना शिवाजी महाराजांच्या चरित्राचे वाचन, अभ्यास करायला सांगावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी केले.
त्या येथील दीपलक्ष्मीच्या सभागृहात श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती आणि सातारकरांची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या बक्षीस वितरणप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष राजू गोरे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, उपाध्यक्ष अमोल मोहिते, कार्याध्यक्ष हरिष पाटणे, उपाध्यक्ष अमर बेंद्रे, उद्योजक विक्रांत पाटील, जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, जीवनात पुढे जाण्यासाठी प्रत्येकांपुढे आदर्श असण्याच्या आवश्यकता असते. लहानपणी आपण ज्या आदर्श व्यक्तिमत्वाचे चरित्र, गोष्टी ऐकतो त्या आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. माझ्या लहानपणी मला स्वामी विवेकानंद, गौतम बुध्द यांच्या गोष्टी, विचार, आदर्श होते. महाराष्ट्राला श्री.छ. शिवाजी महाराजांच्या कतृर्त्वाचा वारसा लाभला आहे. त्यांच्या ३५० गड-कोट किल्ल्यांमागे एक गोष्ट आहे. ती ऐकणे, अभ्यासणे गरजेचे असून त्यातून प्रेरणा, जीवनाचे शिक्षण मिळेल. नवीन पिढीने इतिहासाचा कधीही विसरु पडू देऊ नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी समितीच्या कामकाजाचा, कार्याचा आढावा घेतला तर कार्याध्यक्ष हरिष पाटणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या कामकाजाचा गौरव करत मुलांनी त्यांच्या कष्टाचा आदर्श घ्यावा. यापुढेही त्यांनी भविष्यकाळात मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी लहान गटात प्रथम - शौर्य प्रशांत सावंत, व्दितीय रेयांश सतीश कदम, तृतीय - आर्णिका अमित वाघमारे, खुला गट - प्रथम - शंभूराज संग्राम जगदाळे, व्दितीय - शिवसंकल्प मित्र मंडळ, तृतीय - धर्मवीर संभाजी महाराज मित्र समूह, समूह गट - प्रथम- अजिंक्य गणेश मंडळ, व्दितीय-अमोल खोपडे, तृतीय -चेतन गायकवाड यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन अमर बेंद्रे यांनी केले. यावेळी रवींद्र माने, नंदकुमार सावंत, सतीश ओतारी, सयाजी चव्हाण, अभिजीत बारटक्के, रविंद्र भारती, अजिंक्य गुजर, उमेश जगताप, अशोक रेमजे, अनिरुध्द जोशी आणि शिवप्रेमी, पालक उपस्थित होते.
शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रत्येकाने अभ्यास करावा : ऑंचल दलाल
३५० व्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

