सातारा / प्रतिनिधी
हुकूमशाहीने काही साधत नाही युद्ध हा त्यावर पर्याय नाही तर शांती हीच मानवतेचा खरा आधार आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. मसाप, शाहुपुरी शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये झालेली चर्चा आणि मुलाखती दरम्यान बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ट साहित्यिक किशोर बेडकिहाळ, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, डॉ. राजेंद्र माने, शिरीष चिटणीस उपस्थित होते.
या मुलाखतीच्या वेळी फ्रीडम ऑन फायर या कथासंग्रहाबाबत चर्चा करण्यात आली. लक्ष्मीकांत देशमुख यांनी युक्रेन आणि रशिया या युद्ध परिस्थिती दरम्यान झालेली राजकीय  ,भौगोलिक आणि तेथील लोकांची मानसिक स्थिती यावर आधारित या सर्व कथा आहेत असल्याचे सांगितले. पुतीन यांची मानसिकता आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची मानसिकता सांगून त्यातूनच या कथांची निर्मिती झाली असे सांगितले. ही मुलाखत साहित्यिक डॉ राजेंद्र माने यांनी घेतली. त्यातून परखड भूमिका असणाऱ्या एका लेखकाचे मनोगत प्रश्नांच्यामधून लोकांच्या समोर उलगडून दाखवले.
याच कार्यक्रमात सर्वप्रथम ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी या कथासंग्रहावर भाष्य व्यक्त करत त्यातील कथांचे मर्म उलगडून दाखवले.  याप्रसंगी प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी शाहूपुरी शाखेच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी  मसाप पुणे येथे स्थानिक कार्यवाह म्हणून निवड झाल्याबद्दल शिरीष चिटणीस यांचा, मसाप पुणे याचे कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी धैर्या कुलकर्णी हिचाही एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केल्याबद्दल मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले.  या कार्यक्रमास अनिल जठार, अजित साळुंखे, संजय माने, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्य प्रेमी, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.