सातारा / प्रतिनिधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशाप्रमाणे जनता सहकारी बँक लि., सातारामध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली होती. मात्र बँकेच्या गत पंचवार्षिक संचालक मंडळाच्या मुदती बरोबरच मागील बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांची देखील मुदत संपल्यामुळे नव निर्वाचित संचालक मंडळाने एकूण ६ सदस्यांची नव्याने बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी निवड केली. त्यापैकी चेअरमनपदी विनोद कुलकर्णी यांची सर्वांनुमते निवड केली.

याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी प्रास्ताविक करून बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. त्यामध्ये बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, माजी चेअरमन, विद्यमान जेष्ठ संचालक श्री. विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य, कायदेतज्ज्ञ ॲड श्री. चंद्रकांत बेबले, टॅक्स कन्सलटंट व गुंतवणुक सल्लागार विनय नागर, डी.बी.एम पदवीधारक, विद्यमान जेष्ठ संचालिका सौ. सुजाता राजेमहाडीक, चार्टर्ड अकौंटंट पंकज भोसले, सायबर लॉ, लेबर लॉ पदवीधारक श्रुती कदम यांचा समावेश आहे. श्रुती किरण कदम या बँकेचे माजी व्यवस्थापक किरण कदम यांच्या कन्या आहेत. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमनपदी नियुक्त करण्यात आलेले विनोद कुलकर्णी हे गेली १८ वर्षे बँकेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गत १० वर्षापासून बँकेच्या सत्ताधारी भागधारक पॅनेलचे प्रमुख म्हणून ते कामकाज पहात आहेत. त्यांनी यापूर्वी बँकेचे चेअरमनपदही भूषवलेले आहे.
याप्रसंगी बोलताना श्री. कुलकर्णी म्हणाले, संचालक मंडळाने बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रिझर्व्ह बँक, सहकार खात्याच्या नियमांचे पालन करून बँकेचा कारभार पारदर्शक व ग्राहक हिताच्या दृष्टीने चालवण्यासाठी सर्व ६ उच्च शिक्षित अनुभवी व्यक्तींची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी निवड केली आहे. याप्रसंगी बँकेचे विद्यमान चेअरमन अमोल मोहिते, व्हाईस चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालक जयवंत भोसले, वसंत लेवे, अक्षय गवळी, तज्ज्ञ संचालक राजेंद्र जाधव, सेवक संचालक अन्वर सय्यद, अभिजित साळुंखे यांच्या हस्ते नवनिर्वाचित बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी जिल्ह्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक म्हणून नावलौकिक असणा-या, बँकींग स्पर्धेत विविध प्रकारच्या आव्हानांना आणि सुधारणांना सामोरे जात स्वत: चे अस्तित्व टिकवणा-या जनता सहकारी बँकेची यशस्वी वाटचाल यापुढेही कायम ठेवण्यासाठी आमच्याकडील ज्ञानाचा, अनुभवाचा पुरेपुर वापर करू. संचालक मंडळाने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सर्वजण सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली.