सातारा - शाखा स्थापनेपासून विविध नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम राबवणा-या, सातारच्या सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मरगळ दूर करणा-या मसाप, पुणे शाहुपुरी शाखेस मसापचा राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा पुरस्कार 2024 जाहीर झाल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. हा पुरस्कार सोमवार दि.27 रोजी सकाळी 10.30 वाजता पुणे येथील मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकात, मसाप शाहुपुरी शाखेचा नुकताच 13 वा वर्धापनदिन झाला. स्थापनेपासून शाखेने विविध नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम राबवले. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रमांची जयंती ते 14 मार्च विदांची पुण्यतिथी असा योग साधून महाराष्ट्रातील पहिला भाषा पंधरवडा सुरु केला तो आजतागायत सुरु आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाने सातारा नगरपालिकेमार्फत देण्यात येणा-या पुरस्काराच्या निवड समितीत शाखेचा सहभाग आहे. विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा साहित्य संमेलन, एकदिवसीय सातारा साहित्य संमेलन, युवा नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. साहित्याच्या व्यासपीठावर सामाजिक कार्यास मदत देण्याचा पायंडा पाडला. त्यातून बाबा आमटेच्या कार्यास 2 लाख 20 हजार, 11 आत्महत्यग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाना मदत, विज्ञान परिषदेला मदत करण्यात आली. नुकतेच राजमाता कै.श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसांचे संमेलन घेण्यात आले. विविध मान्यवरांचे व्याख्याने, कविसंमेलन, परिसंवाद, पुस्तक प्रकाशने, मुलाखती, शिवार साहित्य संमेलन, विविध पुस्तकांवर चर्चा असे उपक्रम राबवले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्रे, दिल्ली येथे आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप, पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमातंर्गत विविध शाळांमध्ये व्याख्याने झाली. कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या घराचे नूतनीकरण आणि त्याचे स्मारकांचे रुपांतर करुन त्याचे लोकार्पणही नुकतेच शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी शाखेनेच प्रथम प्रस्ताव दिला होता. रयतच्या छ. शिवाजी कॉलेजबरोबर सामंजस्य करार करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. मर्ढे हे कवितेचे गाव व्हावे, तसेच सरकारी स्मारकाचे लवकर लोकार्पण व्हावे यासाठी शाखेकडून पाठपुरावा सुरु आहे. जिल्हयातील मान्यवर साहित्यिकांच्या घराचे व स्मारकाच्या दुरुस्तीचे, पुतळा बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
या सर्व कार्याची दखल घेऊन 118 वर्षांची परंपरा असलेल्या, महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था मसाप, पुणे ने शाहुपुरी शाखेला राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा पुरस्कार जाहीर केला आहे. रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, फिरता करंडक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सोमवार दि. 27 मे रोजी पुणे येथे मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळण्यात मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद आणि सातारकरांचा मोठा हातभार असल्याचेही श्री. कुलकर्णी यांनी पत्रकात नमूद केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मसाप शाहुपुरी शाखेचे विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक आणि सातारकरांनी अभिनंदन केले आहे.
मसापचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार मसाप शाहुपुरी शाखेस जाहीर

