सातारा, दि. 28 – माहिती तंत्रज्ञान हे फक्त इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध आहे हा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे. तंत्रज्ञानला फक्त बाजारपेठेची भाषा कळते. मराठी टिकवायची असेल तर त्यांचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान वापरण्यासाठी मराठीचा वापर वाढवला पाहिजे. मराठी संस्कृती, समाज, अस्तित्व टिकवायचे असेल तर मराठी भाषा मातृभाषेबरोबरच ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे असे मत एम.के.सी.एल. कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले. येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, शाहुपुरी शाखा आयोजित पहिल्या मराठी भाषा पंधरवडयाच्या सातव्या वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मराठी भाषा आणि तंत्रज्ञान याविषयावर बोलत होते. व्यासपीठावर विकास देसाई, विनोद कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ आणि मान्यवर उपस्थित होते. डॉ. सावंत पुढे म्हणाले, तंत्रज्ञान मराठीत उपलब्ध असूनही आपण वापरत नाही. सर्वप्रथम कॉम्प्युटर, मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन मराठी भाषेला प्राधान्यक्रम द्यायला हवा. मराठीची ओळख, संस्कृती, समाज टिकवणयासाठी जास्तीत जास्त भाषा वापरणे गरजेचे आहे. भाषा गमावली तर अनेक तोटे होणार आहे ती जतन करण्यासाठी मराठीत बोलले पाहिजे. चीन, जपान, रशिया, तुर्कस्तान या देशांनी त्यांच्या भाषेबाबत जी रणनीती अवलंबली ती रणनीती मराठीबाबत अवलंबणे गरजेचे आहे. मराठी मातृभाषेबरोबरच ज्ञानभाषा कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आशयसंपन्न मराठीला मरण नाही. मराठीला फक्त साहित्याची, करमणूक, मनोरंजनाची, बोली भाषा म्हणून ठेवता येणार नाही त्यात नवीन ज्ञान निर्मिती होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानात येणारी प्रत्येक गोष्ट तत्क्षणी मराठी लोकांना उपलब्ध होतात याचा अनुभव यावा लागेल. सर्वसामान्यांना समजेल अशी प्रमाण भाषा निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्याकडे प्रमाण भाषा आणि शासकीय भाषा अशी दुफळी निर्माण झाली आहे. वल्गना वेगळया आणि कृती वेगळी अशी परिस्थिती आहे. अभिजन आणि बहुजन यामधला फरक दूर केला तरच प्रमाण भाषा निर्माण करण्यात यश येईल. अभिजन म्हणजे काय याची व्याख्या तपासण्याची गरज आहे. अभिजन आणि बहुजनाची भाषा एकच होणे आवश्यक आहे. मराठी ज्ञानसत्ता करायची असेल तर भाषेबद्दल धोरण बदलणे गरजेचे आहे. 21 वे शतक हे सर्वसामान्यांच्या असमान्य कर्तृत्वाचे शतक आहे प्रत्येकाने लक्षात ठेवणे त्याप्रमाणे कृती करण्याचे गरज आहे. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन मराठी भाषा पंधरवडयाचा प्रारंभ झाला. यावेळी एम.के.सी.एलच्या विकास देसाई यांनी आय.टी.त मराठी आणि मराठी भाषिकांसाठी याविषयावर प्रेझेंटशन दिले. त्या माध्यमातून मराठीचा वापर करुन तंत्रज्ञान सहजरित्या वापरु शकते हे दाखवून दिले. प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी मसाप, शाहुपुरी शाखेचा आढावा घेत मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी लढा सुरु असून लोकसभा निवडणुकीनंतर गरज पडली तर न्यायालयीन लढाई करण्याची तयारी असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी तर आभार अॅड. चंद्रकांत बेबले यांनी मानले. यावेळी मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य, साता-यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सातारकर मोठया संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा पंधरवडयातील दुसरा कार्यक्रम शनिवार 2 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे. प्रभाकर पेंढारकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘रारंग ढांग’ हा ध्वनीफित व सादरीकरण कार्यक्रम वंदना बोकील-कुलकर्णी करणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.