सातारा - काश्मिरियत हे केवळ प्रवासवर्णन नाही तो माझा आत्मशोधाचा प्रवास आहे. प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्रांमधून काश्मीर संबंधी माझ्या मनात तयार झालेली प्रतिमा आणि उरी टिटवाल आणि गुरेझ या भारत पाकिस्तान सीमारेषां जवळील गावात एकटीने तीन आठवडे वास्तव्य केल्यानंतर आलेले अनुभव यातील विरोधाभासामुळे हा आत्मशोधाचा प्रवास सुरू झाला या प्रवासामुळे माझा सामान्य माणसाचा चांगुलपणा आणि मानवतेच्या मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ झाला. असे मत सुप्रिया राज यांनी व्यक्त केले.
त्या येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपरिषद आयोजित पहिल्या मराठी भाषा पंधवड्याच्या 13 व्या वर्षानिमित्त दुसरे पुष्प गुफंताना बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, डॉ. उमेश करंबेळकर उपस्थित होते.
सुप्रिया राज पुढे म्हणाल्या, काश्मिरबाबत इतरांकडून ऐकून विविध प्रकारचे गैरसमज असले तरी या प्रदेशामध्ये धर्मापेक्षा माणुसकीला महत्व आहे. फक्त मुलींना काश्मीरचा विषय समजून सांगता यावा म्हणून एकट्याने काश्मीरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. काश्मीरच्या अंतर्गत भागात एकटे फिरताना आलेले विविध अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. अनेक ठिकाणी एकटे फिरताना लोकांनी प्रथम मला मदत केली नंतर माझी जात, धर्म विचारला. काहीवेळेस वाईट अऩुभवही आले परंतु त्यापेक्षा चांगले अनुभव जास्त आले. अनेकांनी बहीण म्हणून सहकार्य केले. मोठ्या माणसांबरोबरच तेथील विद्याथर्यांनी केलेली मदत आयुष्यभर स्मरणात राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. या भटंकतीत विविध लोकांनी मदत केल त्यापैकी मजीद भाई नावाच्या एका व्यक्तीशी त्यांनी कार्यक्रम सुरु असतानाच संपर्क साधून त्यांच्याविषयी असलेल्या भावना काय आहेत हे उपस्थित श्रोत्यांना ऐकवले.
यावेळी त्यांनी श्रोत्यांना विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, हा प्रवास मी संपूर्णपणे राजकारण विरहित भावनेतून केला. पण काश्मिरलमधील कलम 370 मागे घेतल्यानंतर तेथील परिस्थिती शांत झाली असून आता तिथे अधिक सुरक्षित वाटत आहे. त्यांचे अनुभव ऐकून उपस्थितांना आपणही एकदा काश्मिरला जाऊन यायला हवे अशी भावना निर्माण झाली. याप्रसंगी डॉ.संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. उमेश करंबेळकर यांनी तर सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी मानले. कार्यक्रमास अजित साळुंखे, ॲड. चंद्रकांत बेबले, तुषार महामूलकर, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य आणि साहित्यिक सातारकर उपस्थित होते.
काश्मीरियतमुळे मानवतेच्या मूल्यांवरील विश्वास दृढ झाला : सुप्रिया राज

