सातारा / प्रतिनिधी
कविवर्य बा.सी. मर्ढेकर हे युगप्रवर्तक कवी होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून वास्तवाचे दर्शन घडवले. माणसाचं आयुष्य काय आहे ? हे त्यांनी कवितेतून मांडले. त्यांनी नवीन शब्द, क्रियापद, रुपके वापरली. आयुष्याकडे नव्याने बघायला शिकवले. त्यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण झाले असून त्याचे स्मारकात रुपांतर झाले आहे. हे स्मारक आता नव वाडमय तीर्थस्थळ म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ कवियत्री अरुणा ढेरे यांनी व्यक्त केला.
मर्ढे (ता.सातारा) येथे मसाप पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आधुनिक मराठी कवितेचे जनक बा.सी. मर्ढेकर यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण, स्मारकाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, मर्ढेकर यांचे नातेवाईक सदाशिव पाडळीकर, मर्ढेकर कुटुंबिय, सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, गावातील मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ कवियत्री अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या, बा.सी.मर्ढेकर हे मोठे कवी होते. सर्जनशील माणसाला दोन आयुष्य असतात एक म्हणजे भौतिक आणि दुसरे म्हणजे त्यांनी केलेले कार्य. मर्ढेकरांच्या साहित्यातून त्यांचे दुसरे आयुष्य आजही लोकांच्या स्मरणात आहे. स्मारकाचे लोकार्पण झाले असून या गावात यापुढे सातत्याने नवनवीन उपक्रम व्हावेत. आतापर्यंत ग्रामस्थांचे सहकार्य सर्वांना मिळाले आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. मर्ढेकरांचे समर्थांशी वाड्मयीन नाते होते. त्यांनी मराठी भाषा, कवितेच्या सामर्थ्याची उपासना केली. या स्मारकामुळे अनेकांना नवीन प्रेरणा मिळेल. मर्ढेकर यांना युगप्रवर्तक कवी म्हटले जाते पण ते का ? हे यावेळी कवियत्री अरुणा ढेरे यांनी उपस्थितांना सांगितले.  श्रध्देमुळे सृजनशीलतेला वाव मिळतो. या परिसराचे महत्व, वैशिष्टय येथे येणाऱ्यांना समजावे यासाठी याठिकाणी गाईड असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. नवनवीन उपक्रम सातत्याने राबवून हा परिसर जागता ठेवला पाहिजे. श्री. कुलकर्णी यांनी उत्तम काम केले असून नवकवींसाठी हे स्मारक मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, श्री. कुलकर्णी यांची शाखा महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. त्यामुळे साहित्य क्षेत्रात साताऱ्याची वेगळी ओळख निर्माण होत असून एक सातारकर म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. या सोहळ्यास मर्ढेकर कुटुंबिय आवुर्जन उपस्थित राहिले यावरुन त्यांचे गावाप्रती असलेले प्रेम दिसून येते. सरकाराच्या स्मारकाचेही लवकरच उदघाटन व्हावे यासाठी प्रयत्न करु. आ. महेश शिंदे यांच्या सहकार्याने ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. मर्ढे कवितचं गाव व्हावं अशी अनेकांची अपेक्षा असून त्यासाठी शासकीय निकष असले तरी खास बाब म्हणून हे गाव कवितचं गाव होण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, कधीकधी बोलण्यापेक्षा भावनांचा अनुभव घेण्याचे महत्वाचे असते, तो आनंद या कार्यक्रमामुळे मिळाला. मर्ढेकरांचे घर जेव्हा प्रथम पाहिले तेव्हा दुरवस्था पाहून खंत वाटली, अस्वस्थ झाले होते परंतु विनोद कुलकर्णी म्हणजे सुयोग्य नियोजन. त्यातूनच त्यांनी हे निवासस्थान, त्याचे स्मारकात रुपांतर अतिशय देखणं केले आहे. सारस्वताच्या दरबारात आज  छत्रपतींची असलेली उपस्थिती ही मोठी बाब आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच साहित्य परिषदेच्या शाहुपुरी शाखेचे विविध उपक्रम यशस्वी ठरले. साहित्य परिषदेच्या कारकीर्दीत हे नूतनीकरणाचं वर्ष आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही हे त्यांनी यावेळी उदाहरणासह सांगितले. या कामाला मिळालेले मर्ढेकर ग्रामस्थांचे सहकार्य आणि लोकसहभाग ही बाब सकारात्मक आहे. शाहुपुरी शाखेचे हे काम साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेत भर घालणारे आणि मोलाचे काम आहे.
मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी मसाप शाहुपुरी शाखा आणि श्री. विनोद कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्यामुळे मर्ढेकर यांच्या निवासस्थानाला न्याय मिळाला.  या गावाचा राष्ट्रीय पातळीवर विकास कसा होईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. हे गाव मराठी कवितेचे विद्यापीठ व्हावं. मनाला विरंगुळा देणारी शक्ती कवितेमध्ये आहे. गावामध्ये प्रवेश करताना कवितांची शिल्प उभी करावीत, तसेच घाटावर कातळ शिल्प उभे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी स्मारकांसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत यांचा संयुक्त सत्कार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यानंतर ज्येष्ठ कवियत्री अरुणा ढेरे यांच्याहस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले,  मर्ढेकरांच्या निवास्थानाचे नूतनीकरण पूर्णत्वाला गेले याबद्दल श्री. कुलकर्णी यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील हा समारंभ माईलस्टोन आहे. सरकारी स्मारक चळवळीचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. श्री. कुलकर्णी यांनी केलेल्या परिश्रमाला यश आले असून स्मारकात रुपांतर केल्यामुळे भिंती बोलक्या झाल्या, त्याचा आनंद, अभिमान वाटतो. जिल्हा बँकेने केलेल्या मदतीबद्दल तसेच ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक आहे. सरकारच्या स्मारकाचे लोकार्पण लवकरच दिमाखात करु, असे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी अजित जाधव यांनी हा ठेवा जपावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती ती सर्वांच्या सहकार्यामुळे पूर्ण करु शकलो याचे समाधान आहे. मर्ढेकर कुटुंबियांनी मालकी देण्याची तयारी दाखवली होती परंतु मालकी मर्ढेकरांची राहू दे आम्हाला फक्त वहिवाट द्या असे आम्ही सांगितले. याची मूळ संकल्पना स्व. अभयसिंहराजे भोसले यांची असून त्यांचे सुपुत्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते लोकार्पण होत आहे हा एक चांगला योगायोग आहे. माझे सर्व सहकारी, प्रा. जोशी यांचा मला पाठिंबा मिळाल्याने हे काम होऊ शकले. विविध लोकांनी तसेच मर्ढे ग्रामस्थांनी केलेले सहकार्याबद्दल त्यांचे आभार. हे गाव साहित्य क्षेत्रातील पर्यटन केंद्र ठरावं अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मर्ढेकर कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक आवुर्जन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही श्री. कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी मर्ढेच्या सरपंच सविता शिंगटे यांनी मर्ढे गाव हे कवितेचं गाव व्हाव, अशी अपेक्षा व्यक्त केली.  कुटुंबियांच्यावतीने रश्मीताई तुळजापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर
प्रारंभी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत निवासस्थानच्या नूतनीकरणाचे, स्मारकाचे लोकार्पण, कोनशीलेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्मारकासाठी योगदान देणाऱ्या अजित जाधव, हिराबाई निकम, शरदबुवा शिंगटे, अतुल जाधव, अनिल जठार, संजय घाडगे, मयुर गांधी, दत्ता शिंदे, सचिन मोहिते, महेंद्र परदेशी, रामदास कुंभार यांचे सत्कार करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांचे, गावातील प्रतिष्ठांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले.
कार्यक्रमास वंदना बोकील, किशोर बेडकिहाळ, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. राजेंद्र माने, शिरीष चिटणीस, डॉ. उमेश करंबेळकर, जनता बँकेचे अनिल जठार, वजीर नदाफ, ॲड. चंद्रकांत बेबले, दिनकर झिंब्रे, पत्रकार श्रीकांत कात्रे, राजन जोशी, राजकुमार निकम, अजित साळुंखे, संजय माने, सतीश घोरपडे, अमर बेंद्रे, चंद्रकांत सणस,  सुभाष सरदेशमुख, प्रवीण पाटील, तुषार महामुलकर,  अॅड. प्रमोद शिंदे, राहुल तांबोळी, जितेंद्र वारागडे,  मर्ढेकरप्रेमी, प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.