सातारा, दि. 27 (प्रतिनिधी)- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांना मसाप, पुणेच्यावतीने महाराष्ट्रातून 5 लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. तर सातारा जिल्हयातून एक लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. साता-यात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मसाप शाहुपुरी शाखेच्या या उपक्रमाचा शुभारंभ सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सातारा शहर पोस्ट ऑफिस येथे झाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा याबाबतचा अहवाल साहित्य अकादमीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून दोन वर्षे झाली. फक्त पंतप्रधान मोदी यांच्या सहीसाठी हा निर्णय राहिला आहे. तो त्यांनी त्वरित घ्यावा यासाठी मसाप,पुणेच्यावतीने महाराष्ट्रातून 5 लाख विनंती पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत. सातारा जिल्हयातून 1 लाख पत्रे पाठवण्यात येणार आहे. साता-यात मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पाठवण्यात येणा-या पत्र उपक्रमाचा शुभारंभ सातारा शहर पोस्ट ऑफिस येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते पत्रपेटीत पत्र टाकून झाला. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक किशोर बेडकिहाळ, मसाप,पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी, डॉ.उमेश करंबळेकर, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीपाद जोशी म्हणाले, आज मराठी भाषा दिन असला तरी तो स्मृतीदिन आहे का असा प्रश्न पडत आहे. साता-यातून सुरु झालेला हा उपक्रम एक व्यापक चळवळीची नांदी आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत यासाठी राज्यकर्त्यांबरोबरच मराठी भाषिकांच उदासिनताही कारणीभूत आहे. ती दूर करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम उपयुक्त ठरतील. प्रत्येकाने भाषा, संस्कृती, साहित्याबद्दल अभिमान बाळगाला पाहिजे. मसाप शाहुपुरी शाखेचा उपक्रम अभिनंदनीय असून ही सुरुवात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व उपक्रम करावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन पिटीशनही दाखल करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मसाप शाहुपुरी शाखेच्यावीने 1 लाख पत्रे पाठवण्याचा उपक्रमाची सुरुवात झाली असून याव्यतिरिक्त सोशल मिडिया तसेच ज्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मराठी भाषिकांची भावना पोहचू शकते ती माध्यमे भाषिकांनी वापरावीत आणि पंतप्रधान मोदींपर्यंत आवाज पोहचवावा. याबाबत लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून गरज पडली तर पंतप्रधान मोदींकडेही शिष्टमंडळ घेऊन जावू. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज असून ती शाहुपुरी शाखेने सुरु केली असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मराठी भाषिकांच्या भावना पाहून सरकारला सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना मसाप पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी म्हणाले, पंतप्रधान मोदींकडे दोन वर्षे प्रस्ताव पडून असून तो असाच मंजूर होईल अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. तो मंजूर व्हावा यासाठी मराठी भाषिकांनी दबाव गट तयार केला पाहिजे. प्रथम पंतप्रधान मोदीं यांना 5 लाख पत्रे पाठवून विनंती करण्यात येणार आहे. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटून तुम्ही पंतप्रधानाकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्वतंत्र भेट घ्यावी अशी विनंती करण्यात येणार आहे. तरीसुध्दा दर्जा न मिळाल्यास पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहे. मराठी भाषा 10 कोटी लोकांची भाषा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. पत्र पाठवण्याच्या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेतला असून आज 25 हजार पत्रे पाठवण्यात आली असून पुढील 15 दिवसात उर्वरित 75 हजार पत्रे पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून 5 लाख पत्रे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, शाहुपुरी शाखेचे कार्यवाह नंदकुमार सावंत, वजीर नदाफ, प्रवीण पाटील, अजित साळुंखे, शाहुपुरी शाखेचे सदस्य आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
मसापचा पंतप्रधान मोदींना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ

