सातारा :   मर्ढे परिसरात यापूर्वी मी अनेकदा आलो आहे परंतु याठिकाणी बदल हवा असे मनोमन वाटत होते. याठिकाणी काहीतरी चांगले व्हावे, ही वास्तू वहिवाटीत यावे असे वाटत होते. तो बदल विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला हे पाहून आनंद वाटला. त्यांनी स्वखर्चाने या वास्तूत येण्याचे आखलेले धोरण बदलू नये, ज्यांना खरोखरच याठिकाणी येऊन नतमस्तक व्हावे असे वाटते, तेच येथे येतील, फॅशन म्हणून कोणी येणार नाही, असे मत बा.सी.मर्ढेकर यांचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.
ते मर्ढे येथे मसाप, शाहुपुरी शाखेने आयोजित केलेल्या कवीवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त बोलत होते. यावेळी  प्रसिध्द चित्रकार, मुखपृष्ठकार रविमुकुल, मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, मसाप पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, मर्ढेच्या सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे आणि मान्यवर उपस्थित होते.
श्री. हर्डीकर पुढे म्हणाले,  मर्ढेकर नवकवी होते तर त्यांनी मुक्तछंदावर कायम टीका केली. ज्याप्रमाणे वारकऱ्यांचे ज्ञानेश्वरी, नामदेव, एकनाथ, तुकारामांची गाथा, दासबोध हे वेद आहेत त्याप्रमाणे मर्ढेकरांच्या कविता एखादा वाचल्या की त्या पुन्हा पुन्हा वाचव्या असे वाटते. त्यांनी कवितेकडे ज्या गांभीर्याने पाहिले तसे पाहणारे फार थोडे कवी होते. त्यांच्यावर बालकवी, माधवराव पटवर्धन यांचा प्रभाव होतो. ते कवितेमध्ये दोन विरोधी गोष्टी एकत्र आणायच्या परंतु त्यातही त्यांनी नाद, छंद, गाण, वृत्त, शिस्त जपली होती. कवींना कवितेकडे गांभीर्याने पाहायला त्यांनी  शिकवले. मर्ढेकर यांच्याबद्दल बोलण्यासारखे बरेच आहे त्यांच्या कविता, चरित्र, समीक्षक, त्यांचे तंत्र, त्यांचा विरोधाभास यावर सांगता येईल. यावेळी श्री. हर्डीकर यांनी मर्ढेकरांच्या कविता, त्यांच्या आयुष्यातील किस्से, गोष्टी, पु.ल.देशपांडेचा गाजलेला किस्सा यासरख्या अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच गावकऱ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. मसाप शाहुपुरी शाखा भविष्यात जिल्हयातील अनेक थोर व्यक्तींचे स्मारक, पुतळे उभारणार आहेत त्याचप्रमाणे त्यात रहिमतूपर येथील नाटकाचे युगप्रवर्तक गो.पु. देशपांडे यांचेही स्मारक घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रसिध्द चित्रकार, मुखपृष्ठकार रविमुकुल, शिरीष चिटणीस, राजन लाखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी पुढील काळात सातारा जिल्हयातील विविध मान्यवर साहित्यिकांची पुतळे उभे करणार असल्याचे सांगितले. तसेच सर्वांच्या सहकार्याने साहित्याची चळवळ पुढे घेऊन जाऊ असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. उमेश करंबेळकर, अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक नितीन पाटील, अमर बेंद्रे, सतीश घोरपडे, तुषार महामूलकर, मर्ढेकरांचे नातेवाईक रश्मी तुळजापूरकर, कुलकर्णी, मर्ढे ग्रामस्थ, मर्ढेकरांवर प्रेम करणारे साहित्यिक उपस्थित होते.


रविमुकुल काढणार मर्ढेकरांचे तैलचित्र

कार्यक्रमात प्रसिध्द चित्रकार, मुखपृष्ठकार रविमुकुल यांनी मर्ढेकरांच्या कविता वाचल्या की ते एक परिपूर्ण चित्र असल्याचे वाटते, असे सांगत मर्ढेकरांचे एक तैलचित्र काढणार असल्याचे सांगितले. तेव्हा विनोद कुलकर्णी यांनी त्याचे योग्य ते मानधन देऊ असे सांगताच त्यांनी हे चित्र विना मानधन काढणार असून मर्ढेकरांच्या जयंतीपूर्वी या वास्तूत ते तैलचित्र लागेल असे जाहीर केले.