सातारा/प्रतिनिधी
आधुनिक कवितेचे जनक बा. सी. मर्ढेकर यांच्या मोड़कळीस आलेल्या घराचे संपूर्ण नुतनीकरण करुन त्याचे स्मारकात रुपांतर करण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने पूर्ण केले आहे. शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनीच नूतनीकरण आणि स्मारकाची संकल्पना मांडून पूर्ण केली आहे. बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचा आणि कार्याचा ठेवा जपण्यासाठी शाहूपुरी शाखेने केलेल्या  या कार्याचा महाराष्ट्र साहित्य परिषदेला अभिमान वाटतो. नूतनीकरण केलेल्या घराचे आणि स्मारकाचे लोकार्पण सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एका सोहळ्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात,  बा. सी. मर्ढेकर यांचे मूळ गाव मर्ढे आहे. त्या गावात बा. सी. मर्ढेकर यांचे वडिल सीताराम मर्ढेकर हे रहात होते. बा. सी. यांच्या वडीलांनी १९४२ मध्ये मर्ढे येथे हे घर बांधले होते. मर्ढे येथील घरात आणि तेथील घाटावर बसून अनेक कविता बा. सी. यांनी लिहिल्या आहेत. निवृत्तीनंतरचा संपूर्ण काळ मर्ढे गावातच व्यथित करण्याची मर्ढेकर यांची इच्छा होती. गावात राहून शेती करावी, नदीतील पाण्यात मनसोक्त डुंबावे, अशी स्वप्ने त्यांनी पाहिली होती. गावाची प्रचंड ओढ त्यांना होती. मर्ढे गाव हे साहित्यीकांसाठी मंदिरच आहे. गेली अनेक वर्षे हे घर बंद अवस्थेत होते. घराची अतिशय दुरावस्था झाली होती. त्यामुळे गावातील मर्ढेकरप्रेमी अजित जाधव यांनी शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना घराची किमान डागडुजी झाली पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी करा, असे सांगितले होते. त्यानंतर मसापचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी शाहूपुरी शाखेला यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यावर विनोद कुलकर्णी यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे घराचे संपूर्ण नूतनीकरण करुन त्याचे स्मारकात रुपांतर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर प्रा.जोशी यांनी विनोद कुलकर्णी यांना पुढाकार घेउन शाहूपुरी शाखेमार्फत हे काम करावे, असे सांगितले होते. त्यानंतर विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या शाहूपुरी शाखेतील सहकार्यांनी या कामात स्वत:ला झोकून दिले. दरम्यानच्या काळात बा. सी. मर्ढेकर यांचे दिल्ली येथे राहणारे सुपुत्र राघव मर्ढेकर यांच्याशी त्यांच्या नातेवाईकांमार्फत संपर्क साधून त्यांची या कामासाठी परवानगी मागण्यात आली. राघव मर्ढेकर यांनी फक्त परवानगी दिली नाही तर बा. सी. मर्ढेकर यांच्या पूर्वजांच्या घराचा ठेवा कायमस्वरुपी जतन व्हावा यासाठी ही वास्तू महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला देउन टाकली. त्यानंतर मर्ढेकरांची वास्तू शाहूपुरी शाखेने पुन्हा दिमाखात उभी केली आहे.
पहिल्या टप्प्यात मर्ढेकर यांच्या घराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हे घर पूर्वी माती आणि चुन्यात बांधण्यात आले होते. एका बाजूच्या घराच्या भिंती पडायला आल्या होत्या. पत्रा खराब झाला होता. घराच्या दोन बाजूंच्या भिंती पूर्ण बांधून घेण्यात आल्या. घराला आतून पूर्णपणे प्लॅस्टर करण्यात आले असून लस्टर पेंट करण्यात आला आहे. घरातील सागवानी काम वगळता जुन्या लाकडांना वाळवी लागली होती. वाळवी लागू नये यासाठीही वाळवीरोधक वापरण्यात आले आहे. घराच्या दारात तुळशी वृंदावन उभारण्यात आले आहे. घराच्या हॉलमध्ये मर्ढेकर यांचा जीवनपट, मर्ढेकर यांच्या काही प्रमुख कविता आणि त्यांचे छायाचित्र लावून घराचे स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे.
घराचा ७० वर्षापासून सांभाळ करणाऱ्या हिराबाई निकम या निराधार महिलेलाही घराच्या दुरावस्थेमुळे बेघर व्हावे लागले होते. या महिलेलाही तिथे राहता येईल, अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. घरात किचनकट्टा, स्वच्छतागृह तिच्यासाठी उभारण्यात आले आहे. घरासाठी स्वतंत्र पाणी आणि वीज कनेक्शन घेण्यात आले आहे. भविष्यकाळातील वीजबिल आणि पाणीबिल शाहूपुरी शाखा भरणार असून काही डागडुजी निघाली तरी तेही काम करणार असून हा ठेवा आता कायमस्वरुपी जपला जाणार आहे. मर्ढेकरांच्या घराची त्या महिलेने केलेल्या सेवेचीही दखल शाहूपुरी शाखेने घेतली आहे. शाहूपुरी शाखेच्या या कामासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जनता सहकारी बँक आणि विविध दानशूर व्यक्तींनी मोठे सहकार्य केले आहे. या कामासाठी तब्बल ९ लाख ४0 हजार रुपये खर्च आला आहे.
हा लोकार्पण सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा, कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले भूषवणार आहेत. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे,  मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, मर्ढेच्या सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, बा. सी. मर्ढेकर यांचे नातेवाईक सदाशिव विष्णू पाडळीकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास मर्ढेकरप्रेमी, ग्रामस्थ आणि जिल्हावासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदकुमार सावंत, सर्व पदाधिकारी, कार्यकारिणीने केले आहे.