सातारा : सातारा नगरपरिषद व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेतर्फे सुरु असलेल्या मराठी भाषा पंधरवडा अतंर्गत येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये रविवारी झालेल्या 'उमगलेले गांधी' या अभिवाचन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
जगात सर्वात जास्त लेखन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर झाले आहे याच विस्तृत लेखनातील काही निवडक लेखांचे अभिवाचन करून गांधीजींचा नव्याने शोध घेण्याचा अभिनव कार्यक्रम झाला. यावेळी दीपक राज्याध्यक्ष यांनी विविध लेखांचे अभिवाचन करून उपस्थितांना गांधीजींची ओळख करून दिली व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे आणि विचारवंत किशोर बेडकिहाळ उपस्थित होते
अविष्कार संस्थेची निर्मिती असलेल्या उमगलेले गांधी या कार्यक्रमाची संकल्पना दीपक राज्याध्यक्ष यांची आहे. सुमारे दीड तासाच्या कालावधीमध्ये दीपक राज्याध्यक्ष यांनी गेल्या 100 पेक्षा जास्त वर्षाच्या कालावधीमध्ये गांधीजींवर जे लेखन करण्यात आले त्यातील काही निवडक लेखांचे वाचन करून गांधीजींच्या चरित्राचे दर्शन उपस्थितांना घडवले.यामध्ये स्वत: गांधीजींनी हरिजन या वृत्तपत्रात लिहिलेले लेख, विनोबा भावे यांनी महात्मा गांधीजींवर लिहिलेला लेख, किंवा वि. स. वाळिंबे, श्रीपाद केळकर यांसारख्या लेखकांना आणि काही परदेशी पत्रकारांना उमगलेले गांधीजी त्यांनी ज्या लेखांमध्ये चित्रित केले होते, अशा विविध लेखांचे वाचन दीपक राजाध्यक्ष यांनी या कार्यक्रमात केले. समकालीन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर आधारित गांधीजींचे जे व्यक्तीचित्रण केले आहे त्याचेही वाचन दीपक राज्याध्यक्ष यांनी या कार्यक्रमात केले. अभिवाचनाच्या निमित्ताने उपस्थित श्रोत्यांना स्वातंर्त्यपूर्व काळातील विविध आंदोलने, दांडीयात्रा, चले जाव चळवळीची उभारणी कशी झाली, गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील संबंध , अहिंसा आणि सत्य हे तत्त्वज्ञान अशा विविध विषयांचा नव्याने बोध झाला. कार्यक्रमाला शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने, प्रा. श्रीधर साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, रविंद्र झुटिंग, नंदकुमार सावंत आणि सातारा शहरातील जाणकार नागरिक उपस्थित होते. अजित साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर बेडकीहाळ यांनी प्रास्ताविक केले.
मराठी भाषा पंधरवडा उपक्रमांतर्गत मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पाठक हॉलमध्येच प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांची प्रगट मुलाखत होणार आहे ही मुलाखत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ घेणार आहेत
मराठी भाषा पंधरवड्यात 'उमगलेले गांधी' अभिवाचन कार्यक्रमाला प्रतिसाद

