सातारा : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत, मसाप पुणे, शाहुपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यशील राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सातारा साहित्य  संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १०, ११ फेब्रुवारी रोजी हे संमेलन होणार असून संमेलनाध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांची निवड करण्यात आली आहे.  हे  संमेलन न्यू इंग्लिश स्कूल येथे होणार असल्याची माहिती मसाप पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यातंर्गत सातारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांचा जन्म निकमवाडी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे झाला आहे. त्यांनी विविध कांदबरी, ललित गद्य, कथांचे लिखाण केले आहे. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाले असून रिंगाण या साहित्य कलाकृतीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे गावठाण या कांदबरीचा मुंबई, सोलापूर, जळगाव, बेळगाव विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे. यापूर्वी त्यांना विविध संमेलनासाठी अध्यक्षसन्मानही मिळाला आहे.
दोन दिवसीय सातारा साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिडींने होणार आहे. शनिवारी दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ग्रंथदिडीं काढली जाणार आहे. आण्णासाहेब राजेभोसले प्रा. विद्यालय सातारा आयोजित ग्रंथदिंडी हत्तीखाना ते न्यू इंग्लिश स्कूल असा असणार आहे. यावेळी जनता सहकारी बँकेचे संचालक जयेंद्र चव्हाण, व्हाईस चेअरमन विजय बडेकर यांची उपस्थिती आहे. संमेलनाचे उदघाटन शनिवारी दुपारी ४ वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सचिव मीनाक्षी पाटील यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत, प्रमुख पाहुणे म्हणून आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, प्रदीप पाटील, शामराव पाटील, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. कवी संमेलन दुपारी ६ ते ८ यावेळेत होणार आहे. सूत्रसंचालक डॉ. आदिती काळमेख असून यात लता चव्हाण, अरुणा सपकाळ, शुभदा कुलकर्णी, मोहसीन आत्तार, अनिल बोधे, अभिजित साळुंखे, चंद्रकांत कांबिरे, डॉ. राजश्री देशपांडे, स्वाती माने, विलास वरे, मयुरेश देशपांडे, वसंत शिंदे, राजेंद्र आफळे, विनोद बडेकर, मुराद तांबोळी हे सहभागी होणार आहेत.
रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत चित्रपट व माध्यमांतील मालिकांचा साहित्यनिर्मितीवर होणार परिणाम याविषयावर परिसंवाद होणार आहे. यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, लेखक, चित्रपट अभ्यासक स्वप्नील पोरे, अभिनेते बाबा शिंदे, संतोष पाटील, पटकथा संवाद, लेखक निलेश महिगावकर हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते १.३० यादरम्यान व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रसिध्द वक्ते, इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे छत्रपती शिवरायांचे आदर्श आणि आजचा युवक या विषयावर व्याख्यान होणार आहे. संमेलनाचा समारोप दुपारी ३ ते ५ यावेळेत खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी  यावेळी प्रसिध्द कवी, गीतकार प्रवीण दवणे यांची प्रकट मुलाखत होणार आहे.  मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने हे घेणार आहेत. याप्रसंगी मसाप पुणे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुनिताराजे पवार यांची मसाप पुणेच्या प्रमुख कार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या दोनदिवसीय सातारा साहित्य संमेलनास साहित्यप्रेमी, सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन दोन्ही संस्थांच्यावतीने मसाप पुणे शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, सर्व पदाधिकारी, कार्यकारिणीने केले आहे.