सातारा : मराठी भावगीताचे अत्युच्च शिखर म्हणजे अर्थातच गीतरामायण. मराठी माणसांच्या मनात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात, तेथे गीतरामायणाने स्थान मिळवले आहे. गदिमा आणि बाबूजींच्या रुपाने मराठीजणांना जणू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाला आहे, अशा या गीतरामायणांच्या सादरीकरणाने सातारकर रसिक मंत्रमुग्ध झाले. कलाकरांनी सादर केलेल्या गीताबरोबरच गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांनी सांगितलेल्या गदिमांच्या आठवणी, गोष्टी, किस्से, त्याचबरोबर सातारकर रसिकांनी दिलेला वन्समोअर आणि कोरस यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिका आयोजित पहिला मराठी भाषा पंधरवड्याच्या १३ वे वर्षाचे उद्घाटन.

आधुनिक वाल्मिकी असा आदरयुक्त उल्लेख ज्यांचा केला जातो ते लेखक, ज्येष्ठ कवी गदिमा यांच्या लेखणीतून उमटलेले गीतरामायण शाहूकलामंदिर येथे गायक अभिजित पंचभाई, हेमंत वाळुंजकर, श्रुती देवस्थळी, मीनल पोंक्षे, हार्मोनियम प्रसन्न बाम, तबला अभिजित जायदे, ताल वाद्य राजेंद्र साळुंखे यांनी सादर केले तर निवेदन होत स्नेहल दामले यांचे. गीतरामायण ऐकणे म्हणजे जणू एक श्रीराम चरित्राचे पारायणच. अशा या पारायणाची सुरुवात आनंद माडगूळकर यांनी गोंदवलेकर महाराजांच्या स्तवनाने केली. वेळेची मर्यादा लक्षात घेता उपस्थित कलाकारांनी  गीतरामायणातील महत्वाचे प्रसंग सादर भावोत्कट पध्दतीने सादर केल्याने शाहू कलामंदिर जणू अयोध्या नगरीच अवतरल्याचा भास निर्माण झाला होता. 'कुश लव रामायण गाती',  'अयोध्या मनोनिर्मिती नगरी', 'राम जन्मला ग सखे राम जन्मला', 'विश्वामित्र मागती', 'रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले', 'सीता स्वयंवर', 'आकाशी जसे जडले नाते',अशी एकाहून एक सरस गीते सादर केल्याने सातारकर रसिकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. टाळ्याचा कडकडाट, वन्स मोअर आणि काही ठिकाणी सातारकरांनी दिलेला कोरस यामुळे शाहू कलामंदिर भारावून गेले होते. त्याच जोडीला गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांनी सांगितलेले गदिमांचे किस्से, आठवणी, गोष्टी यामुळे कार्यक्रम आणखीच बहारदार झाला.

प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मराठी भाषा पंधरवड्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मसाप पुणे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, आनंद माडूगळकर, मसाप पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार दीपक शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर संयोजकांच्यावतीने मान्यवरांचा आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मसाप पुणेचे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार म्हणाल्या, मसाप, शाहुपुरी शाखेने जो जो उपक्रम केला तो यशस्वी करुन दाखवला आहे. त्यांचे सगळेच उपक्रम स्तुत्य असतात. साहित्यिक बंधुभाव निर्माण करण्याचे काम साहित्य परिषद करते. व्यवहार, शैक्षणिक आणि कलेची मराठी भाषा वेगली आहे. जोपर्यंत कला जिवंत आहे तोपर्यंत माय मराठी तरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकर दीपक शिंदे यांनी मराठी भाषेचे महत्व सांगत वर्षातून केवळ महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन, वाचणा प्रेरणा दिन या दिवशी मराठी भाषेचे स्मरण न करता दैनंदिन मराठी वापरासाठी आग्रह धरला पाहिजे. त्यासाठी शालेय व्यवस्था दुरुस्त करणे, नियोजन करणे आणि आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रास्तविकात मसाप पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषा पंधवड्यात गेल्या १३ वर्षांपासून सातत्य ठेवलेली मसाप पुणे शाहुपुरी शाखा एकमेव आहे. आमच्या सगळ्यांना उपक्रमांना मसाप पुणेचे पाठबळ आणि सहकार्य मिळत असते. शाखेच्या बा.सी.मर्ढेकरांच्या घराचे नूतनीकरण आणि स्मारकात रुपांतर या उपक्रमाचे महाराष्ट्रातून कौतुक, अभिनंदन होत असून पदाधिकारी आणि सातारकरांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले. कार्यक्रमास किशोर बेडकिहाळ, डॉ. उमेश करंबेळकर, शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने, अजित साळुंखे, प्रा. श्रीधर साळुंखे, ॲड. बाळासाहेब बाबर, प्रवीण पाटील, वजीर नदाफ, तुषार महामूलकर, सचिन सावंत, संजय माने, मसाप शाहुपुरी शाखेचे सदस्य, पदाधिकारी आणि सातारकर रसिक उपस्थित होते.

चौकट

मराठी भाषा पंधवड्यातील दुसरा कार्यक्रम शनिवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे. अलिबाग येथील सुप्रिया राज यांचा काश्मिरीयत हा कार्यक्रम होणार आहे. त्यात काश्मिरच्या अंतर्गत भागात स्वत: एकटे फिरताना आलेले अनुभव त्या कथन करणार आहेत.