सातारा : साहित्याचा प्रसार गावोगावी व्हावा या भूमिकेतून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने शिवार साहित्य संमेलन ही नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. मसाप शाहुपुरी शाखा आणि जकातवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी जकातवाडी येथे सायंकाळी ४ ते ८ यावेळेत शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या तीन वर्षाच्या कालखंडानंतर मसाप, पुणे शाखेने पुन्हा एकदा शिवार साहित्य संमेलन सुरु करण्याचा निर्णय घेतला असून मसाप, शाहुपुरी शाखेकडे जबाबदारी सोपवली आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्यावरणप्रेमी, प्रसिध्द लेखक डॉ. संदीप श्रोत्री यांची निवड करण्यात आल्याची माहिती मसाप शाहुपुरीचे शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी  यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.   मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांची ही संकल्पना आहे.  मसाप, पुणे आणि मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पहिले शिवार साहित्य संमेलन नागठाणे येथे अतित येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब लोहार यांच्या शेतावर झाले होते. त्याला साहित्यिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु त्यानंतर कोरोनामुळे त्यामध्ये खंड पडला होता. आता पुन्हा एकदा शिवार साहित्य संमेलन सुरु करण्याचा निर्णय झाला असून जकातवाडी येथे माजी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत सणस यांच्या पुढाकाराने आणि मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने हे दुसरे शिवार साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. श्री.सणस यांनी संमेलनाचा वेगळा पॅटर्न केला असून त्याची राज्यभर दखल घेतली जाईल असा हा पॅटर्न आहे.  मसाप, पुणे च्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारची शिवार साहित्य संमेलन घेण्यात येणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाऱ्या लेखक, कवी, कवियत्रींना मानधन दिले जात नाही.  अनावश्यक खर्च केला जात नाही, मात्र थेट शेतकऱ्याच्या शिवारात संमेलन भरवून साहित्य परिषद यानिमित्ताने शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे. जकातवाडी येथे होणाऱ्या  शिवार साहित्य संमेलनास मसाप, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रभारी प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती आहे. संमेलनात लेखक डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. संंमेलनाध्यक्षपदी डॉ. संदीप श्रोत्री यांची निवड करण्यात आली आहे. ते रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ सातारा या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके राजहंस प्रकाशनने प्रसिध्द केली आहेत. त्यात एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस यासह विविध पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी दुर्गसाहित्य संमेलन, जैवविविधताबाबत जनजागृती, विकास आणि संवर्धन यामधून शाश्वत विकास कसा होईल यासाठी प्रयत्न, विविध ट्रेकींगमध्ये सहभाग नोंदवला आहे.  पक्षनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण आदी विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. या शिवार साहित्य संमेलनास साहित्यिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मसाप शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, जकातवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी केले आहे.