सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे,शाखा-शाहूपुरी आणि सातारा नगरपरिषद, सातारा. यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिला भाषा पंधरवड्याचे १३ वर्षानिमित्त एक अभिनव कार्यक्रम मसाप, पुणे शाहुपुरी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सूत्रसंचालन कार्यशाळा हा नवीन प्रयोग राबवण्यात आला, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत मार्गदर्शन प्रसिध्द सूत्रसंचालिका स्नेहल दामले यांनी केले. दोन दिवस ४० निमंत्रितांची कार्यशाळा घेण्यात येऊन यात दररोज पाच तास घेऊन नवीन सूत्रसंचालक घडवण्यासाठी विशेष अभ्यासक्रम, सूत्रसंचालन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे उदघाटन जनता सहकारी बँकेच्या ज्येष्ठ संचालिका डॉ.चेतना माजगावकर, रवींद्र झुटींग, विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी स्नेहल दामले यांनी सांस्कृतिक,साहित्यिक,सांगीतिक,राजकीय,शासकीय, कार्पोरेट, अश्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना घ्यावयाची काळजी ,सादरीकरण,प्रात्यक्षिक,तसेच स्वत:चे अनुभव असे विविध विषय अतिशय सोप्या आणि नवीन सूत्रसंचालकला समजतील असे सादर करून सुंदररित्या शिकवले. या कार्यशाळेत खूप काही शिकायला ऐकायला मिळाले, याची निमंत्रित सदस्यांना प्रचिती आलीच. बरेच वेळा व्यासपीठ उपलब्ध असून सुध्दा स्टेजवर बोलण्याची भीती, आत्मविश्वासाची कमी असल्याने आपली बोलण्याची हिंमत होत नाही पण अशा उपक्रमातून ह्या सगळ्या गोष्टींचा विसर पडून जातो. यावेळी दामले यांनी नुसती पुस्तके वाचन करणं उपयोगाचं नाही पुस्तके वाचलीच पाहिजेत पण त्याबरोबरीने काही कार्यक्रम स्वत: हजर राहून ऐकले सुध्दा पाहिजेत तरच या सूत्रसंचालनाचे गमक समजेल असे बरेच मुद्दे त्यानी सांगितले. त्याचप्रमाणे सूत्रसंचालक म्हणजे हारामधील न दिसणारा, बांधून ठेवणारा दोरा असतो. लोक कशाला टाळ्या वाजवतात याकडे लक्ष देणे आवश्यक असून उत्तम श्रोता होणे गरजेचे आहे. निवेदकाने कार्यक्रमाचा धागा सोडायचा नाही, सूत्रसंचालकाने कार्यक्रमात पूर्ण मनाने, लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते.  त्यापूर्वी संयोजकांसोबत मिटींग चांगली होणे आवश्यक असते. निवेदक हा त्या त्या संस्थेच्या प्रतिमेचा
विषय असतो त्यामुळे भाषा, आवाजाचा टोन सांभाळणे आवश्यक असते. कमीत कमी शब्दात पण मुद्देसुद्द बोलणे आवश्यक असते अशा विविध लहान-सहान गोष्टी त्यांनी कार्यशाळेत सांगितल्या. प्रास्ताविक मसाप पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. चेतना माजगावकर, रवींद्र झुटींग यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले. कार्यशाळेत्स विविध क्षेत्रातील चाळीस निमंत्रित उपस्थित होते.