सातारा, दि. 4 – येथील मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडयाच्या सातव्या वर्षाचे कार्यक्रम सुरु आहेत. त्याअंतर्गत पाठक हॉल येथे प्रभाकर पेंढारकर यांच्या कांदबरीवर आधारित रारंग-ढांग हा ध्वनीफित कार्यक्रम वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सादर केला त्यास सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी त्यांनी प्रभाकर पेंढारकर यांनी तयार केलेली बॉर्डर रोड हा लघुपट दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी कादंबरी कशी लिहिली याबाबत माहिती सांगितली. एरव्ही पहिल्यांदा कादंबरी लिहिली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर चित्रपटाची निर्मिती होती परंतु रारंग-ढांग या कादंबरीबाबत मात्र उलटे आहे. प्रभाकर पेंढारकर यांनी लघुपटाची निर्मिती केली आणि त्यानंतर जवळपास 3 वर्षांनी कादंबरी लिहिलेली. यावेळी वंदना बोकील-कुलकर्णी यांनी लघुपटातील स्लाईडस आणि कादंबरीमधील प्रसंगा यात काही प्रमाणात साम्य कसे आहे याचे विवेचन केले. ही कादंबरी एक सिविलियन इंजिनियर आणि बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन ही लष्कराची सह-संस्था यांच्यातील संघर्षाचे चित्र उभे करते. एक तत्वनिष्ठ, बुध्दीमान पण त्याचबरोबर एककल्ली भासावा असा विश्वनाथ टोकाचा संवेदनशीलही आहे. तो आपल्या कामाकडे निव्वळ रोजगार म्हणून न पाहता एक बांधिलकी म्हणून पाहतो आहे. व्यवस्थेने ठरवून दिलेल्या उतरंडीबाबत त्याला प्रश्न पडतात. संपूर्ण कादंबरी अतिशय चित्रमय आणि ओघवत्या शैलीत लिहिलेली आहे. एखाद्या चित्रपटाची पटकथा म्हणून सहज वापरता येईल इतकी शब्दचित्राच्या स्वरुपात आहे. यामधील विविध दृश्ये, एकदम उत्कट ह्दयस्पर्शी प्रसंग, खटकेबाज संवाद, माणसांच्या विविध स्वभावाचे नमुने, रुबाब दाखवणारे अधिकारी, कामसू, दारिद्र्यात पडलेले कामगार, भयानक कडे-कोसळणी आणि या सर्वांच्या तळाशी वाहणारा एक अंतःप्रवाह हे सर्व वंदना बोकील-कुलकर्णी यांनी आपल्या विवेचनातून सातारकर श्रोत्यांसमोर उलगडून दाखवले. प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मसाप, शाहुपुरी शाखेचे कार्यवाह डॉ. उमेश करंबेळकर यांचा वाढदिवसानिमित्त आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. कार्यक्रमास मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य, साहित्यिक रसिक आणि सातारकर मोठया संख्येने उपस्थित होते. या पंधरवडयातील पुढील कार्यक्रम 9 मार्च रोजी होणार आहे. पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त पुलंचा बटवा हा कार्यक्रम नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सायंकाळी 6.30 वाजता होणार असून अभय देवरे आणि वनराज कुमकर हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत.