सातारा / प्रतिनिधी
आसपास घडणाऱ्या घटनांमधून साहित्यिक, कवी घडत असतो. गणिताचं लॉजिक लावता येते अगणिताचं लॉजिक लावता येत नाही. लिखाणचं संपादन होणे आवश्यक आहे. बडबड करण्यापेक्षा कृती आवश्यक आहे. सध्या अभासी जग आहे त्यावर भरपूर लिहिले जाते परंतु आभासी दाद खऱ्या कलावंतला संपवते. स्तुती श्रोते, स्तुती पाठक झाले.  आभासी लेखनाचे स्वागत केले पाहिजे परंतु क्षेत्र कोणतेही असो यशस्वी होण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही, असे मत प्रसिध्द कवी, गीतकार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत, मसाप पुणे, शाहुपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यशील राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेल्या सातारा साहित्य संमेलनाचा समारोप कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या मुलाखतीने झाला त्यावेळी ते बोलत होते.  शिरीष चिटणीस आणि डॉ. राजेंद्र माने यांनी ही मुलाखत घेतली.
मुलाखतीमधील विविध प्रश्नांना कवी दवणे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, कविवर्य बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत आदींच्या कविता मनात झिरपत गेल्या. शालेय जीवनातच साहित्याचे सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या शिक्षकांनी बालपण समृद्ध केले. तोच वारसा जपत आलो आहे. त्यामुळेच, आतापर्यंतच्या साहित्यप्रवासात संकोच वाटावा अशी एकही ओळ मी आजपर्यंत लिहिलेली नाही, आतापर्यंत घडलेल्या प्रवासाचाही त्यांनी सुरेख पट मांडला. शेकडो भावगीते लिहिणाऱ्या प्रा. दवणे यांनी १२५ हून अधिक मराठी चित्रपटांसाठी गीतरचना केली आहे. कोणत्याही भाषेची मुळाक्षरे जीवनात मुरावी लागतात, तेव्हाच भाषा अवगत होते. आईवडिलांनी वाचनाचे संस्कार केले. शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बा. भ. बोरकर यांचे पहिले दर्शन घडले; तर पुढे त्यांच्यासोबत काव्यवाचनाची संधी मिळाली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर कुसुमाग्रज यांची भेट घेतली. ज्ञानपीठप्राप्त अमृता प्रीतम यांनी दिलेला आशीर्वाद आणि पुस्तकं अजून जपून ठेवली आहेत. माझ्या गीताच्या दोन ओळी लतादीदी यांनी गाव्यात, अशी उत्कट इच्छा होती; ती पूर्ण झाली. तसेच टीकेला कसे सामोरे जायचे याची शिकवण दीदींनी दिलीच; याशिवाय दु:खाच्या प्रसंगी मला सावरले. जीवनात अनेक साहित्यिक, कलावंत भेटलेच पण विशेष मुलांच्या संस्थेत भेटलेल्या पालकांनी अंतर्मुख केले. वैयक्तिक जीवनातील दु:ख पचवून अफाट यश संपादन करणाऱ्या आशा भोसले यांनी कोणताही साहित्यिक, प्रतिभावंत आणि कलावंत हा दु:ख पचवल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय समाजासाठी दीपस्तंभ ठरत नाही, ही शिकवण दिली. विनोदी किस्से, यमक, उपमा, अलंकार यांची पखरण करीत सुभाषितवजा वाक्यांची रेलचेल असलेल्या मुलाखतींनी रसिकांची मने जिंकली. शेवटी प्रवीण दवणे यांच्या कविता वाचनाने मुलाखतीचा समारोप झाला.
प्रारंभी मसाप पुणे प्रमुख कार्यवाह पदी निवड झाल्याबद्दल सुनिताराजे पवार यांचा कवी, गीतकार प्रवीण दवणे, रवींद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किशोर बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने, नंदकुमार सावंत उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सुनिताराजे पवार यांनी हा सत्कार माहेरचा असल्याने खास आहे. सातारा जिल्हयात सर्वजण एकदिलाने काम करतात ही आनंदाची बाब आहे. आतापर्यंतच्या माझ्या यशात सातारा जिल्हयाचा सिंहाचा वाटा आहे. यापुढे कुठल्याही पदांवर गेली तरी मी सातारा जिल्हयाची म्हणून राहिल असे मत व्यक्त केले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात चित्रपट व माध्यमांवरील मालिकांचा साहित्य निर्मितीवर होणार परिणाम या विषयावर परिसंवाद झाला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, लेखक, चित्रपट अभ्यासक स्वप्नील पोरे, अभिनेते बाबा शिंदे, संतोष पाटील, पटकथा, संवाद,लेखक निलेश महिगावकर उपस्थित होते. त्यानंतर इतिहास अभ्यासक, प्रसिध्द वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे छत्रपती शिवरायांचा आदर्श आणि आजचा युवक या विषयावर व्याख्यान झाले, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अविनाश कदम, वजीर नदाफ, अमर बेंद्रे आणि मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या सातारा साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. समारोपाचे सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले. याप्रसंगी ॲड. चंद्रकांत बेबले, अनिल जठार, रवींद्र झुटींग, अजित साळुंखे,सतीश घोरपडे, संजय माने, सचिन सावंत, तुषार महामूलकर, साहित्यप्रेमी आणि सातारकर रसिक उपस्थित होते.