सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक असलेल्या जनता सहकारी बँक लि., सातारा, बँकींग व्यवसायाबरोबरच सामाजिक उपक्रमात देखील नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहा महिन्यापूर्वी बँकचे भागधारक पॅनेलप्रमुख, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून, संचालक मंडळ सदस्य, जनता बँक कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या मंगळवार पेठ शाखेत सुरू केलेल्या अत्याधुनिक प्रशस्त, संपूर्णपणे मोफत अभ्यासिका, मार्गदर्शन केंद्राचे दोन विद्यार्थी शासनाच्या नुकत्याच झालेल्या सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांना तलाठी या पदावर नियुक्ती आदेश प्राप्त झाला आहे. त्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळ, जनता बँक कर्मचारी संघाच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विनोद कुलकर्णी यांनी तलाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेले तन्मय दशरथ चिकणे (सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी ), तेजस्विनी दिलीप भुते (सातारा जिल्हा तलाठी) यांचे विशेषत: अभिनंदन करून बँकेने ज्या उद्देशाने अभ्यासिका सुरू केली. त्या उद्देशाची यशस्वी सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांच्या या यशात जनता बँक अभ्यासिकेचा खारीचा वाटा आहे. अभ्यासिकेतील इतर विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेवून जास्तीत जास्त चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांसाठी नजीकच्या काळात आय.ए.एस/ आय.पी.एस अधिकारी याचे मार्गदर्शनपर व्याख्यान नियमितपणे आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी चेअरमन अमोल मोहिते, जेष्ठ संचालक आनंदराव कणसे, संचालिका डॉ. चेतना माजगांवकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, शाल व पेढे देवून यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी केले. तन्मय चिकणे, तेजस्विनी भुते यांनी मनोगत व्यक्त करून बँकेचे संचालक मंडळ, जनता बँक कर्मचारी संघ यांना अत्याधुनिक, सर्व सोयींनीयुक्त अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र व ते ही संपूर्णत: मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक, अभ्यासिकेतील विद्यार्थी, बँकेचे संचालक चंद्रशेखर घोडके (सराफ ), वजीर नदाफ, नारायण लोहार, ॲड. चंद्रकांत बेबले, सेवक संचालक अन्वर सय्यद, अभिजित साळुंखे, जनता सहकारी बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, प्रशासन अधिकारी महेंद्र पुराणिक, अभ्यासिकेचे नियमित देखरेख ठेवणारे बँकेचे अधिकारी अमितकुमार कणसे, इतर अधिकारी / कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
जनता बँकेच्या अभ्यासिकेतील दोन विद्यार्थ्यांचे सरळ सेवा परीक्षेत यश : विनोद कुलकर्णी

