सातारा : राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे १३ वे वर्ष असून २७ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, साताऱ्यात साहित्यिक चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने १३ वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने राज्यातील मराठी पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि वि.दा.करंदीकर यांचा स्मृतीदिनाचे औचित्य साधून या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. यंदाचे १३ वर्ष असून त्याचा प्रारंभ मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे.
मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटन मसाप पुणेचे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, दै. लोकमतचे मुख्य उपसंपादक दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी गदिमा, बाबूजी यांची अजरामर कलाकृती असलेल्या गीतरामायणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांच्यासोबत गदिमांच्या आठवणी, गप्पांची मैफिल होणार आहे. गायक अभिजित पंचभाई, हेमंत वाळुंजकर, श्रुती देवस्थळी, मीनल पोंक्षे, हार्मोनियम प्रसन्न बाम, तबला अभिजित जायदे, ताल वाद्य राजेंद्र साळुंखे सहभागी होणार असून निवेदन स्नेहल दामले करणार आहेत.
दुसरा कार्यक्रम शनिवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे. अलिबाग येथील सुप्रिया राज यांचा काश्मिरीयत हा कार्यक्रम होणार आहे. त्यातकाश्मिरच्या अंतर्गत भागात स्वत: एकटे फिरताना आलेले अनुभव त्या कथन करणार आहेत. याप्रसंगी मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, प्रसिध्द लेखक डॉ. संदीप श्रोत्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मंगळवार दि.५ व ६ मार्च रोजी फक्त निमंत्रितासाठी सूत्रसंचालन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. चेतना माजगावकर यांच्या हस्ते होणार असून अश्वमेध, ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष रवींद्र झुटींग यांची प्रमुख उपस्थिती आहे. प्रसिध्द सूत्रसंचालिका स्नेहल दामले या मार्गदर्शन करणार आहेत. सांस्कृतिक, साहित्यिक, सांगीतिक, राजकीय, शासकीय, कॉर्पोरेट अशा विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना घ्यायची काळजी, सादरीकरण, प्रात्यक्षिक, अनुभव कथन, प्रश्नोत्तरे या कार्यशाळेत होणार आहेत.
रविवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पाठक हॉलमध्ये अविष्कार निर्मित, उमगलेले गांधी (अभिवाचन)हा कार्यक्रम होणार आहे. धनश्री करमकर, मंगेश भिडे, गीता पांचाळ, दीपक राजाध्यक्ष हे वाचन करणार आहेत. संकल्पना दीपक राज्याध्यक्ष यांची असून संशोधन, संपादन उन्मेष अमृते, निर्मिती, सूत्रधार अरुण काकडे यांची आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, दै. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची असणार आहे. मंगळवार दि.१२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिध्द वक्ते, मसाप पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ हे मुलाखत घेणार आहे. यावेळी मसाप सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी , नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
मराठा भाषा पंधरवड्याचा समारोप गुरुवार दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे. यावेळी कविता, गझल आणि गप्पांचा 'नवंकोर' हा कार्यक्रम होणार आहे. आदित्य दवणे, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक आणि प्रसिध्द अभिनेत्री, कवियत्री स्पृहा जोशी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, दै. सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, मसाप पुणे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी भाषा पंधरवड्यांच्या या सर्व कार्यक्रमांना साहित्यप्रेमी, रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन, मसाप, शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, उपाध्यक्ष अजित साळुंखे, कार्यवाह ॲड. चंद्रकांत बेबले, पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.
साताऱ्यात मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम
सातारा नगरपालिका, मसाप शाहुपुरी शाखेचा संयुक्त उपक्रम

