सातारा / प्रतिनिधी
सातारकरांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जनता सहकारी बँकेवर विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भागधारक पॅनेलने सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारली. रविवारी मतमोजणीच्या दिवशी १७ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये भागधारक पॅनेलच्याच उमेदवारांनी मताधिक्यांने विजय मिळवला. तर यापूर्वी पॅनेलचे चार उमेदवार बिनविरोध झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत भागधारक पॅनेलने विरोधकांचा २१-0 असा धुव्वा उडवला. पॅनेलचे सर्व उमेदवार हे तब्बल दोन ते अडीच हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येताच बँकेचे किंगमेकर विनोद कुलकर्णी यांना कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेत जल्लोषात गुलालाची उधळण केली.
सातारा शहराची अस्मिता असलेल्या जनता बँकेचा निवडणुक कार्यक्रम गत महिनाभरापूर्वी जाहीर झाला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी असणाऱ्या भागधारक पॅनेलने बँक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. विनोद कुलकर्णी यांनी सर्वसामावेशक संचालक मंडळ तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. पॅनेल प्रमुख म्हणून भूमिका बजावताना त्यांनी विरोधी पॅनेलमधील अनेक सदस्यांना बँक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यामध्ये बहुतांश जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या विमुक्त जाती जमाती हे मतदारसंघ बिनविरोध झाले.
मात्र, सर्वसाधारण आणि ओबीसी या मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवारांनी शड्डू ठोकल्याने दोन उमेदवारांमुळे १७ जागांसाठी निवडणूक लागली. १७ जागांसाठी शनिवारी ३४ केंद्रावर ३२.३४ टक्के मतदान झाले. बँकेच्या २१ हजार ८१ मतदारांपैकी ६ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर सर्वमतपेट्या जरंडेश्वर नाका येथील नागरी बँक्स असोसिएशनच्या हॉलमध्ये आणून ठेवण्यात आल्या. रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता मतमोजणीला १२ टेबलवर सुरूवात झाली. प्रारंभी मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात आले. यानंतर ८.३0 च्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीस सुरूवात झाली. यावेळी भागधारक पॅनेलचे माजी संचालक आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. तर पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी हे मतमोजणीच्या ठिकाणी सकाळपासूनच होते. हळू-हळू प्रत्येक मतदान केंद्राची मोजणी होत होती त्याची आकडेमोड केली जात होती. सकाळी ८.३0 वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी ३ च्या सुमारास संपली.
बँकेसाठी सर्वसाधारण मतदारसंघातून १६ आणि ओबीसी मतदारसंघातून १ अशा १७ उमेदवारांना निवडून द्यायचे होते. मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून आनंदराव कणसे यांना ५ हजार १0९ मते, विनोद कुलकर्णी यांना ४ हजार ३८६ मते, अक्षय गवळी यांना ५ हजार ११५ मते, चंद्रशेखर घोडके यांना ५ हजार ५९ मते, जयेंद्र चव्हाण यांना ४ हजार ९८९ मते, मच्छद्रिं जगदाळे यांना ४ हजार ७३९ मते, वजिर नदाफ यांना ४ हजार ५५७ मते, अविनाश बाचल यांना ४ हजार ६७५ मते, अॅड. चंद्रकांत बेबले यांना ४ हजार ७७४ मते, जयवंत भोसले यांना ५ हजार १३५ मते, रवींद्र माने यांना ४ हजार ८0३ मते, अमोल मोहिते यांना ५ हजार १0६ मते, वसंत लेवे यांना ४ हजार ९३९ मते, नारायण लोहार यांना ४ हजार ६११ मते, रामचंद्र साठे यांना ४ हजार ६५२ मते, माधव सारडा हे ४ हजार ८५४ इतकी मिळवून विजयी झाले. तर विरोधी गटातील शकील बागवान यांना २ हजार ३५३ मते मिळाली.
ओबीसी प्रवर्गातून भागधारक पॅनेलचे अशोक मोने यांना ५ हजार २२ मते तर त्यांच्या विरोधातील चारुशील सपकाळ यांना अवघी १ हजार ३३५ मते मिळाली. मोने हे तब्बल ३ हजार ६८७ मतांनी विजयी झाले. तर भागधारक पॅनलचे महिला राखीवमधून सुजाता राजेमहाडिक, चेतना माजगावकर, अनुसूचित जाती-जमातीमधून विजय बडेकर आणि विमुक्त भटक्या जाती-जमातीमधून बाळासाहेब गोसावी हे विजयी झाले आहेत. दरम्यान, विरोधी गटातील शकील बागवान आणि चारुशील सपकाळ यांचा मतदानाचा अंदाज चुकल्यामुळे मतमोजणी केंद्रावर हे दोघे फिरकले सुद्धा नाहीत. त्यांचे प्रतिनिधी मात्र मतमोजणी केंद्रावर होते.
या निवडणूकीत अशोक मोने यांच्या विरोधात चारुदत्त सपकाळ हे उभे होते. सुरुवातीपासून अशोक मोने यांनी लिड घेतले ते शेवटपर्यंत कायम होते. चारुदत्त सपकाळ यांना अनेक केंद्रावर दोन अंकी मतेही पडलेली नाहीत. त्यांना एकूण १३३५ मते तर मोने यांना ५ हजार २२ मते पडली असून सर्वात जास्त फरकाने मोने हे विजयी झाले. ६ हजार ७९२ मतांपैकी ४३५ मते बाद झाली. जनता बँकेचे आणि वाहतूक संघटनेचे नेते माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी यांचे एक वेगळे नाते आहे. या निवडणूकीत प्रकाश गवळी यांचे चिरंजीव अक्षय गवळी हे होते. त्यांनी सुरुवातीपासूनच विजयी घौडदौड कायम ठेवली. त्यांच्यासह नव्या दमाचे ॲड. चंद्रकांत बेबले यांचा समावेश आहे.
मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांना सहकार अधिकारी गणेश देशमुख, दत्ता मोहिते, तानाजी देशमुख, नंदकुमार शिंदे, रणजित देशमुख, नामदेव साबळे यांनी सहकार्य केले. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर जरंडेश्वर नाक्यावर भागधारक पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्ललोषात गुलालाची उधळण केली. तसेच शहरातून कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅलीही काढण्यात आली.
विनोद कुलकर्णी यांची रणनिती यशस्वी
जनता बँकेचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी यांनी वारंवार बँकेला ३५ लाखाच्या निवडणूक खर्चाला सामोरे जायला लावू नका, बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करुया, असे आवाहन केले होते. दरम्यान, यामध्ये विजय बडेकर, बाळासाहेब गोसावी, सुजाता राजेमहाडिक आणि चेतना माजगावकर यांना बिनविरोध करण्यात यश आले होते. तरीही माजी नगरसेवक शकिल बागवान आणि चारुदत्त सपकाळ या दोघांनी आपले अर्ज ठेवल्याने निवडणूक लादली गेली. या निवडणूकीमध्ये भागधारक पॅनेल यशस्वी करण्यासाठी किंगमेकर विनोद कुलकर्णी यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली.
मतमोजणीत ४५७ मते बाद
बँकेसाठी ६ हजार ८२१ जणांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. मतमोजणीवेळी अनेक सभासदांना मतदानच करता आले नसल्याचे मतमोजणीवेळी दिसून आले. त्यामुळे सर्वसाधारण मतदारसंघातून ४५७ तर ओबीसी मतदारसंघातून ४३५ मते बाद ठरवण्यात आली.
सभासदांच्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञ
जनता सहकारी बँक वाचवली अन टिकवली. या कामाची पोहोच पावती सभासदांनी मतपेटीतून दिली आहे. तबब्ल दोन ते अडीच हजाराच्या मताच्या फरकाने विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यात आम्हांला
यश आले आहे. सभासदांनी अपप्रचाराला बळी न पडता बँक सक्षम अन भक्क्म कोण ठेवू शकेल, त्याच्या पाठीमागे राहण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. भविष्यात बँकेचा विस्तार अन विकास करुन सातारकरांची ही बँक महाराष्ट्रात कशी पोहोचेल यादृष्टीने पावले टाकणार आहे. अनेक अपप्रवृत्ती, कामचुकारी आणि निष्क्रीय असलेल्या कर्मचाऱ्यांनी विरोधाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचीसुध्दा लायकी त्यांना मतपेटीतून समजली आहे. त्यांच्यापाठीमागे असलेल्या अनेक शिखंडीनाही मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. संस्था चांगली चालवली म्हणजे लोक आपोआप पाठीशी उभे राहतात. हे सुध्दा या निकालातून स्पष्ट झाले आहे. ॲड. मुकुंद सारडा यांची आज उणीव जाणवते, ते आज हयात असते तर आणखी मोठा विजय मिळवला असता. तरीही तमाम सभासदांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचा नेहमीच कृतज्ञ राहील.
- विनोद कुलकर्णी, भागधारक पॅनेल प्रमुख.

