Vinod kulkarni
⟵ Back to Home

Vinod kulkarni

साहित्य क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करुन देणारे व्यक्तिमत्व
साहित्य क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करुन देणारे व्यक्तिमत्व

साहित्य क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करुन देणारे व्यक्तिमत्व

पत्रकारिता, सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीनंतर विनोद कुलकर्णी यांनी साहित्य क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली. सातारा शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे परंतु 1992-93 साली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर साहित्य क्षेत्रात भरीव काम झाले नव्हते. साता-यातील नामवंत साहित्यिक, विचारवंत यांना अखिल भारतीय स्तरावर स्थान मिळत नव्हते त्यामुळे पत्रकार, सहकार क्षेत्रातील विनोद कुलकर्णी यांनी मसाप, शाहुपुरी शाखेची स्थापना पाच वर्षापूर्वी केली. अल्पावधीत विविध उपक्रम, व्याख्याने, चर्चासत्र, संमेलने घेऊन साहित्य क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. या शाखेच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडून शाखेची स्थापना आणि विविध उपक्रम साहित्य क्षेत्राला आलेली मरगळ दूर झाली पाहिजे. विविध उपक्रमांव्दारे मान्यवर साहित्यिक, लेखक, विचारवंत सातारकरांना ऐकायला, बघायला मिळाले पाहिजेत या हेतूने मसाप, शाहुपुरी शाखेची स्थापना झाली. स्थापनेनंतर मराठी भाषा दिन आणि सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाडमय मंडळ असे उपक्रम सुरु केले. या उपक्रमांना सातारकरांचा प्रतिसाद मिळाल्याने नवनवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहन मिळाले. याबाबत बोलताना विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘‘ शाखेची स्थापना केल्यानंतर किशोर बेडकिहाळ, विश्वास दांडेकर, पी.एन.जोशी, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, प्रमोद कोपर्डे यांच्यासारख्या मान्यवरांचे पाठबळ लाभले. त्यांच्यामुळेच विविध नामवंत साहित्यिक, लेखक, विचारवतांना साता-यात आणता आले. लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम सुरु करण्यामागे ज्या संशोधकाचा आपल्या पाठयपुस्तकात धडा आहे त्याच्याकडूनच याबाबत अधिक जाणून घेतल्यास विद्याथर्यांना प्रेरणा मिळेल, दहावी, बारावीनंतर संशोधन क्षेत्रात सुध्दा संधी असल्याचे कळेल या जाणीवेतून हा उपक्रम राबवला. त्याअंतर्गत डॉ. जयंत नारळीकर यांनी साता-यात येऊन विद्याथर्यांशी संवाद साधला.’’ साता-यात ज्याठिकाणी मान्यवर व्यक्ती राहिल्या होत्या अशा ठिकाणी त्यांचे स्मृतीफलक सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने उभारण्यात आले. नवीन पिढीला त्याबद्दल माहिती व्हावी हा त्यामागे उद्देश होता. आजपर्यंत शहरातील विविध ठिकाणी फलक बसवण्यात आले आहेत. मान्यवरांची उपस्थिती आणि संमेलने शाखेच्या विविध कार्यक्रमासाठी कवी मंगेश पाडगांवकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रविंद्र कोल्हे, अनिल अवचट, डॉ. अनिल काकोडकर, अभिनेते अतुल कुलकर्णी, सई परांजपे, प्रवीण दवणे, डॉ. श्रीपाद जोशी, प्रा.रा.र. बोराडे, कवियत्री अरुणा ढेरे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अनेक माजी अध्यक्ष, मंगला गोडबोले, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक यांच्यासह अनेक विविध विषयांवरील मान्यवर लेखक, विचारवंत साता-यात आले. सातारकरांना त्यांचे विचार ऐकता आले. शाखेने एकदिवसीय साहित्य संमेलन ही संकल्पना राबवली. त्याचबरोबर साता-यात दोन विभागीय साहित्य संमेलन, युवा नाटय संमेलन घेतले. किशोर बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाडमय मंडळ कार्यरत असून त्यात विविध विषय, विविध पुस्तके, लेखनावर चर्चा केली जाते. साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्यास मदत एकदिवसीय साहित्य संमेलनाबाबत बोलताना श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘ साहित्यिक उपक्रम म्हणजे समाजातील दानशूर व्यक्तींकडून घेऊन राबवले जातात असा समज आहे. परंतु शाहुपुरी शाखेने साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्यास मदत देऊन नवीन पायंडा पाडत हा समज खोडून काढला. त्यासाठी प्रसिध्द उद्योजक संतोष यादव आणि दानूशर सातारकरांची मोलाची साथ मिळाली. यातून डॉ. प्रकाश आमटे यांना अडीच लाख रुपये, डॉ. रविंद्र कोल्हे यांना सव्वा लाख रुपये, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबियांना मदत करण्यात आली. विज्ञानाच्या प्रसारासाठी मराठी विज्ञान परिषदेस 25 हजाराची मदत दिली. त्याचप्रमाणे शाखेच्यावतीने शेतक-यांसाठी बंधारा बांधण्याचे नियोजन आहे.’’ सामंजस्य करार आजच्या युवा पिढीपर्यंत साहित्य पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन साहित्यिक तयार होण्यास मदत होईल. या संकल्पनेतूनच शाखेने रयत शिक्षण संस्थेबरोबर तीन वर्षाचा सामंजस्य करार केला. मसापच्या 111 वर्षाच्या इतिहासात अशाप्रकारचा करार करणारी शाहुपुरी शाखा पहिली आहे. शाखेच्या या उपक्रमाचे अनुकरण मसापच्या इतर शाखांनी केले त्यामुळे ख-या अर्थाने साहित्यिक चळवळीला गती मिळणार आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मोहीम मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने समिती नेमली होती. समितीने अहवाल तयार करुन साहित्य अकादमीकडे पाठवला होता. साहित्य अकादमीने शिफारशीसह तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला होता परंतु दोन वर्षे झाली तर त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शाखेने मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना जिल्हयातून एक लाख पत्रे पाठवण्याचा उपक्रम सुरु केला. या मोहीमेबाबत बोलताना विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘शाखेच्यावतीने आतापर्यंत 70 हजार पत्रे पाठवण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रमुक यांच्याशी पत्रव्यवहार केला. शाखेच्या पत्रामुळेच जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदीं यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभापतींनीही याबाबत लवकर कार्यवाही व्हावी याचे निर्देश दिले. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या पत्रव्यवहारात मद्रास हायकोर्टाच याबाबत याचिका प्रलंबित होती त्यामुळे प्रस्ताव रखडला होता परंतु ऑगस्ट 2016 मध्ये हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा कृतीशील कार्यवाही सुरु झाल्याचे सांस्कृतिक मंत्रालयांच्या सचिवांनी कळवले. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणण्यात आणि तो सुटावा यासाठी शाखेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.’’ मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने आता मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात कोणतीही अडचण राहिलेली नाही तरीही आठ ते नऊ महिने उलटून गेले तरी काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला परंतु त्यांच्या कार्यालयाकडून कोणतेच उत्तर न आल्याने 1 मे रोजी वर्षा या निवासस्थानी साहित्यिकांसह धरणे आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा शाखेच्यावतीने देण्यात आला. त्यानंतर सूत्रे हलली. मुंबईत आंदोलनास परवानगी नाकारल्यानंतर 4 मे रोजी मुख्यमंत्री भिलार येथे येणार होते त्यावेळेस काळे झेंडे दाखवण्याचा इशारा शाखेच्यावतीने देण्यात आला. परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखवली. याबाबत बोलताना विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘भिलार येथे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि भाजपच्या कांता नलावडे आणि इतरांनी आंदोलनापेक्षा चर्चा करुया असे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पाचगणीच्या हेलिपॅडवर शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना याबाबत पाठपुरावा करु तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरात लवकर कसा निर्णय होईल याबाबत व्यक्तीशः प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर भिलार येथे जेष्ठ नेते शरद पवार हे आले असताना त्यांना भेटून हायकोर्टाने याचिका फेटाळली असून या प्रश्नात कोणतीही अडचण राहिली नसून आपण पुन्हा एकदा याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी अशी विनंती केली. त्यामुळे आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. हा दर्जा मिळाल्याने केंद्र सरकारकडून 200 ते 300 कोटी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे 2000 विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकवली जाणार आहे त्यामुळे मराठीचा प्रसार होणार आहे.’ अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवणे उद्दिष्ट साता-यात 1992-93 साली अखिल भारतीय संमेलन झाले होते परंतु त्यानंतर 25 वर्षात साता-यात पुन्हा संमेलन व्हावे अशी मागणीही कुणी केलेली नाही. साता-यात पुन्हा एकदा संमेलन व्हावे यासाठी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शाहुपुरी शाखा गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत असून आता शाखेने 2019 मध्ये साता-यात संमेलन व्हावे असे उद्दिष्ठ ठेवले आहे. साता-यात झालेल्या संमेलनाची आठवण आजही काढली जाते. त्याचप्रमाणे आता होणारे संमेलन दर्जेदार आणि कमी खर्चात व्हावे यासाठी शाहुपुरी शाखा प्रयत्नशील आहे. शाखेच्या सक्रीय कार्यामुळे साता-यातील निवेदिका स्नेहल दामले यांना दोन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. तसेच किशोर बेडकिहाळ यांनाही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन विचार मांडता आले. त्यामुळे ज्या उद्देशाने शाखेची स्थापना झाली होती त्याकडे शाखेची वाटचाल सुरु आहे. शाहुपुरी शाखेचे शिलेदार शाहुपुरी शाखेला अल्पावधीत मिळालेले यश हे माझ्या एकटयाचे नसल्याचे विनोद कुलकर्णी नम्रपणे नमूद करून म्हणतात ‘ या यशामध्ये ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, कार्याध्यक्ष नंदुकमार सावंत, कोषाध्यक्ष राजेश जोशी, कार्यवाह अॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबळेकर, सुभाषचंद्र सरदेशमुख, प्रवीण पाटील, संजय माने, अमर बेंद्रे, दिपाली धुमाळ, फातिमा नदाफ यांच्यासह लेखक डॉ. राजेंद्र माने, दिनकर झिंब्रे, साता-यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी यांचे आहे. नगरवाचनालय, सातारा नगरपालिका, प्रसिध्द उद्योजक संतोष यादव तसेच साता-यातील दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी सहकार्य केले आहे.’ कार्याध्यक्षांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मसाप, शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केलेल्या परिश्रमाचे आणि कार्याची दखल घेऊन मसाप, पुणे त्यांना यावर्षीचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर केला आहे. पाच वर्षाच्या कार्यकाल असणा-या शाहुपुरी शाखेचा हा बहुमान असून मसापच्या दुस-या कोणत्याच शाखेच्या इतक्या कमी कार्यकाल असणा-या शाखेला हा पुरस्कार मिळालेला नाही. नंदकुमार सावंत यांनी शाखेच्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन, संयोजन, सूत्रसंचालन, मान्यवरांची व्यवस्था यात सक्रीयपणे सहभाग घेतला असल्यानेच त्यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. शब्दांकन - प्रशांत शिराळकर,सातारा
🟢 WhatsApp