अन असा गेला पुण्यातील पहिला दिवस....
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कोषाध्यक्ष पदाचा पदभार आज अधिकृतपणे स्वीकारला. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष, माझे मार्गदर्शक प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आवर्जुन उपस्थित राहिल्या. पदभार स्वीकारताना प्रा. जोशी सरांनी आणि सुनीताराजे पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कोषाध्यक्ष पदाच्या आसनावरही या दोघांनी मला सन्मानपूर्वक बसवले. परिषदेच्या मुख्य कार्यालयात कोषाध्यक्ष म्हणून माझ्या नावाची पाटीही तयार होती. पदभार घेण्यापूर्वीच नावाची पाटीही तयार असल्याने थोडे आश्चर्य वाटले आणि मनही भारावून गेले. पदभार स्वीकारल्यानंतर परिषदेच्या आर्थिक गोष्टींचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने चर्चा केली. कोषाध्यक्षपदाच्या कारभाराला आजपासून अधिकृतपणे प्रारंभ केला आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली भरीव आणि उठावदार काम निश्चितपणे करता येईल याची खात्री आहे. परिषदेचे कामकाज आटोपून भारती विद्यापीठामध्ये परिषदेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. परिषदेच्या कामकाजाचा आढावा त्यांना दिला आणि पुढील वाटचालीसाठी काय काय करता येईल याची माहिती दिली आणि परिषदेला आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. यावेळी डॉ. शिवाजीराव कदम यांनी माझा सत्कार केला. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांचाही सत्कार केला. आमच्या निवडीबद्दल मनापासून आनंद झाल्याचे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राज्य सहकारी बॅंकेच्या विभागीय कार्यालयात परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले. परिषदेच्या कामकाजाचा आढावा त्यांना सादर केला. पूर्ण झालेली कामे त्यांना सांगितली. भविष्यात करावयाच्या कामाची माहिती दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार उपस्थित होत्या. अनास्कर साहेबांनी भविष्यकालीन योजनांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. एकूणच पुण्यातील पहिला दिवस अतिशय व्यस्त गेला. वरिष्ठांचा आनंद आणि पाठिंबा यामुळे भविष्यातील कारकीर्द यशस्वी होईल याचा विश्वास निर्माण झाला आहे. योगायोगाने पदभार घेताना शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंतही सोबत होते, हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सावंत यांनी तो आनंद अनुभवला किंबहुना वाटून घेतला, त्याचेही आज एक वेगळे समाधान आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या पाठिंब्यामुळे या संधीचे निश्चित सोने करेन,अशी ग्वाही यानिमित्ताने द्यावीशी वाटते.
-विनोद कुलकर्णी